राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी मंगळवारच्या बैठकीत संघटना आणि महायुतीतील घटक पक्षाकडून मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांनी मंगळवारच्या बैठकीत संघटना आणि महायुतीतील घटक पक्षाकडून मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमध्ये नेमके काय सुरू आहे, याची माहिती आम्हाला खालच्या स्तरापर्यंत मिळत नाही. त्यामुळे पक्ष कमजोर होत असल्याची स्पष्ट जाणीव काही आमदारांनी पक्ष नेतृत्वाला करून दिली .
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नव्या नेतृत्वात दुफळी मजल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज, देवगिरी या शासकीय निवासस्थानी पक्षाच्या सर्व मंत्री, आमदार, खासदारांची बैठक बोलवली होती.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह ३५ च्या आसपास आमदार बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत पक्षबांधणीसह राज्यातील भीषण दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा झाली. सुनील तटकरे यांनी आमदारांना दुष्काळी भागांचे दौरे करण्याच्या सूचना दिल्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.