मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

मुंबईत मुसळधार पावसासह भरती आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे..

मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. बुधवारी (दि.२२) पहाटेपासून शहरासह उपनगरांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्याचाही अनुभव नागरिकांना आला. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस

अंधेरी, पवई, मालाड, कांदिवली, मुलुंड, वांद्रे, सायन, महालक्ष्मीसह दक्षिण मुंबईतील अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाने जोर धरला. सकाळी मरीन ड्राइव्ह परिसरात दाट ढगांची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिवसभर आकाश ढगाळ राहून शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज कमाल तापमान सुमारे २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

अतिवृष्टी, वादळी वारे आणि भरतीचा इशारा

हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भरतीचा इशारा दिला असून, मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातही मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रस्ते वाहतुकीवर परिणाम

सतत सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आणि विलेपार्ले परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू होती. पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी ते मुलुंड-ठाणे दरम्यानही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

लोकल सेवा सुरू, मात्र विलंब

मुंबई लोकल सेवा मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मध्य रेल्वेच्या काही गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरळीत सुरू असून, रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

51

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.