महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप बुकिंगवर आकारला जाणारा ३० टक्के अधिभार रद्द केल्याने प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.,
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रुप बुकिंगवर आकारला जाणारा ३० टक्के अधिभार रद्द केल्याने प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या ५,१८४ बसांचे ग्रुप बुकिंग पूर्ण झाले असून, उत्सवासाठी आरक्षित करण्यात आलेल्या अतिरिक्त ५,७४१ बसांपैकी जवळपास ९० टक्के बस ग्रुप बुकिंगमधून भरल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने १० ते १३ सप्टेंबरदरम्यान विशेष बससेवा चालविण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील प्रमुख बसस्थानकांमधून या अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.
अतिरिक्त ५,७४१ बसांचे बुकिंग पूर्ण झाले असून, त्यापैकी ५५७ बस वैयक्तिक आरक्षणाद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. मुंबई विभागातून २,००५ बसांचे बुकिंग झाले असून, त्यापैकी १,७८० बस ग्रुप बुकिंग आणि २२५ बस वैयक्तिक आरक्षणाच्या आहेत. ठाणे विभागातून सर्वाधिक ३,०९१ बसांचे, तर पालघर विभागातून ६४५ बसांचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे होणाऱ्या मोठ्या प्रवासी लोंढ्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबईतून ६००, अन्य विभागांतून ४ हजार बसेस
प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एसटीच्या मुंबई विभागातून सुमारे ६०० बस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसह अन्य विभागांतून ४ हजारांहून अधिक बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवासी सेवेसाठी बस रवाना करण्यापूर्वी त्यांची स्थिती तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व बस सुस्थितीत आणि प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री करूनच त्या सेवेत दाखल केल्या जाणार आहेत.
बसस्थानकांवर २४ तास कर्मचारी
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या काळात वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान एसटीसमोर असणार आहे. त्यामुळे बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.