योजनांचं गाजर.. सरकार आणि सर्वसामान्यांच्या डोक्यावर लादला जाणारा कर..

आमचा कुठल्याच राजकीय पक्षाला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाची तळीही उचलीत नाही. पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने आज जे चाललंय त्याची वाटचाल महागाईचा भस्मासुर गोर गरिबांना भस्म करण्याच्या दिशेने निघालेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष वारेमाप घोषणा करतात. सर्वसामान्यांना योजनांचं गाजर दाखवतात. मग हे लोक निवडून आल्यावर लाडकी बहीण अथवा इतर काही योजना आणतात. बरं मोठेपणा तुम्ही केला आहे तर पैसे तुमच्या खिशातून द्या ना. नाहीतरी आज अपवाद वगळता राजकारणाचं जरा जास्तच गुंडाकरण झालेलं आहे. पूर्वी राजकारणात गुंड प्रवृत्तीचे लोक नव्हते असं मुळीच नाही. मात्र, आज ते जरा जास्त प्रमाणात आहेत. धनंजय मुंडे  पहा ना. असे कितीतरी मस्तवाल मुंडे राजकारणाला यांच्या बापाची मक्तेदारी समजून मस्तवाल झालेले आहेत. यांना वेळीच कायद्याचा बांबू लावायला हवा. लाडकी बहीण आणली आणि कितीतरी बहिणींना मेहनत करण्या ऐवजी फुकट देण्याची सवय लावली. उलट अशी योजना न आणता हेच पैसे माता भगिनींना गृहउद्योगासाठी बिनव्याजी द्यायला हवे होते. पण सरकारने चुकीचा पायंडा पडला आहे. आता १५०० चे २१०० करतांना सरकारच्या तोंडाला फेस आला आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्याचे अजितदादा पवार वारंवार सांगत आहेत. अर्थशास्त्रात असं म्हणतात की एक खड्डा बुजवायचा असेल तर दुसरीकडे खड्डा खोदावा लागतो. आणि सरकार सर्वसामान्यांच्या डोक्यावर करांचा बोजा टाकून तथा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून सरकारने केलेल्या मोठेपणाची किंमत आपल्याकडून वसूल करीत आहे. आपल्या पैशातून हा खड्डा सरकार भरू पाहत आहे. अरे तुम्ही केलेल्या बडेजावपणाची शिक्षा आम्ही का भोगायची..?? पण आज लोक राजकीय नेते आणि त्यांच्या भूलथापांना भुलून आणि विविध पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे अंधभक्त झाले आहेत. आपण सरकारला प्रश्न विचारणे जणू विसरलेले आहोत. यात तुम्ही आम्ही अगदी सगळेच आलो आहोत बरे..

मध्यंतरी काय तर महिलांना एसटीबस सेवा फ्री, वृद्धांना फ्री, रेल्वे मध्ये सुद्धा अमाप सवलती. अरे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार भेटत नाहीत आणि तुम्ही तुमच्या मोठेपणासाठी अगदी काहीही सवलती देणार काय.? एसटीवाल्यांनी या गोष्टीला जोरदार विरोध केला होता. तिथे डिपॉझिट भरायला पैसे नसल्याने हॉस्पिटलात माझ्या माता भगिनी मरत आहेत आणि सर्वसामान्य सुद्धा मरत आहेत. आणि तुम्ही हे फुकटचं गाजर तुमच्या फायद्यासाठी लोकांना दाखवीत अहात.. सर्वसामान्यांच्या करातून दिल्या जाणाऱ्या या  फुकटचा बडेजाव मिरविणाऱ्या सर्व योजना बंद करा आणि त्या पैशांचा वापर आरोग्य, शिक्षण आणि गोर गरिबांना हक्काचा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी करा. काही जणांना हे झोंबेल तिखट आहे. पण, आम्ही आमच्या पोटाला चिमटा काढून तुमच्या मोठेपणाची किंमत का मोजायची..?? उद्या सत्तेवर बसलेले मग ते कुणी का असेना आम्ही निसर्गाने बहाल केली हवा घेतोय म्हणून त्यावर सुद्धा कर लावतील. जागे व्हा आणि अशा सर्वसामान्यांना गोत्यात आणणाऱ्या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी एकत्र व्हा.. बाकी सगळ्यांना सगळे कळते हो आज दूधखुळे कुणीच नाही. फक्त आपल्यात वास्तव स्वीकारण्याची आणि ते स्पष्टपणे बोलण्याची ताकद नाही..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

21

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.