उत्तर कोलकाता येथील चोरबागन दुर्गा पूजा मंडपात शनिवारी रात्री पावसामुळे अचानक गर्दी वाढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १९ झाली आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या ७ जणांना स्थानिक बँकशाल न्यायालयात नेण्यात आले..
कोलकाता : उत्तर कोलकाता येथील चोरबागन दुर्गा पूजा मंडपात शनिवारी रात्री पावसामुळे अचानक गर्दी वाढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १९ झाली आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या ७ जणांना स्थानिक बँकशाल न्यायालयात नेण्यात आले. आम्ही त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत, असे अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितले. अटक केलेल्यांमध्ये पूजा समितीचे सचिव, उपाध्यक्ष आणि एका खासगी सुरक्षा संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल केला आहे.
कोलकात्यातील दुर्घटनेनंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी दुर्गा पूजा पंडालमधील ‘व्हीआयपी गेट्स’ बंद करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, गर्दीच्या वेळी सुरक्षित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी थेट मार्ग तयार करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रत्येकाला ५ लाख रुपयांचा धनादेश नुकसानभरपाई म्हणून दिला जाईल.
उपचारांची जबाबदारी सरकारकडे
मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत जाहीर केली असून सरकारी नोकरी दिली जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे कॅबिनेट मंत्री उमेश राय यांनी केली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पश्चिम बंगाल सरकारने एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे, असे राय म्हणाले.
विशेष पथक स्थापन
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी म्हणाले, ‘शनिवारी घडलेल्या घटनेनंतर लगेचच एक विशेष पथक स्थापन केले. या पथकात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव, अग्निशमन सेवा महासंचालक अनुज शर्मा आणि विशेष कृती दलाचे (एसटीएफ) अतिरिक्त महासंचालक जावेद शमीम यांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी जखमींची विचारपूस
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी सकाळी खासगी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. शहा यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि जखमींवर सुरू असलेल्या उपचारांचा आढावा घेतला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.