भीषण दुर्घटना! नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू..

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराबाहेर भरधाव ट्रकने भाविकांना चिरडल्याने १४ जणांचा मृत्यू, तर २८ जण जखमी झाले. पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर..

नवरात्रीच्या उत्साहात देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे रविवारी (दि. १८) पहाटे भीषण अपघात घडला. शीतला माता मंदिराबाहेर भाविकांची गर्दी असताना एक भरधाव ट्रक थेट त्यांच्या अंगावर धावून गेला. भाविकांना आणि रस्त्यालगतच्या दुकानांना धडक देत ट्रक मंदिराच्या प्रवेशद्वारावर आदळला. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून, किमान २८ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ ते ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मध्यरात्री दीड वाजता नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमधील चिनोर मार्गावर असलेल्या शीतला माता मंदिराजवळ रविवारी पहाटे सुमारे दीड वाजता हा अपघात झाला. मंदिराजवळ उताराचा रस्ता असून, त्या परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी होती.

मात्र, पंजाबमधील नोंदणी क्रमांक असलेला ट्रक या प्रतिबंधित भागात शिरला. भरधाव ट्रकने आधी रस्त्यावरील भाविकांना आणि दुकानांना धडक दिली. त्यानंतर तो थेट मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. धडक इतकी जोरदार होती की मंदिराच्या डाव्या बाजूची भिंतही कोसळली.

ट्रकचे ब्रेक निकामी झाले होते का?

प्राथमिक तपासात ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ट्रक डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला असावा, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ट्रक सरळ पुढे गेला असता तिथे उपस्थित असलेल्या सुमारे ६०० ते ७०० भाविकांना धोका निर्माण झाला असता, असंही एका तपास अधिकाऱ्याने सांगितलं. मात्र, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

१४ जणांचा मृत्यू, २८ जखमी

ग्वाल्हेर परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक असित यादव यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून, २८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने ग्वाल्हेरमधील ट्रॉमा सेंटरसह विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर

या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “ग्वाल्हेरमधील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीचं वृत्त ऐकून दुःख झालं. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

'एवढी सुरक्षा असताना ट्रक आत आलाच कसा?'

या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. मंदिर परिसरात सायकललाही जाणं कठीण असताना एवढा मोठा ट्रक आत कसा आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. प्रवेशबंदी असतानाही ट्रक मंदिर परिसरात कसा शिरला, सुरक्षा व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या आणि अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार असल्याचं पोलीस महानिरीक्षक असित यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

45
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.