'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंडी हाऊस परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा हिची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली..
नवी दिल्ली : दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित 'लहरा दो तिरंगा' मोर्चापूर्वी दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके याला प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. अभिजीतला आज शनिवारी (दि. १७) विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) अध्यक्षा नेहा बोरा हिची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. शांतता राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि संभाव्य दखलपात्र गुन्हा रोखण्यासाठी कारवाई करणे, या तरतुदींचा या प्रकरणात आधार घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वीही विमानातून घेतले होते ताब्यात
यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर येथे CJP च्या नियोजित आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके सह पक्षाचे सदस्य सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मुंबईहून विमानाने दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर शांतता राखण्याच्या हमीपत्रावर त्यांची सुटका करण्यात आली होती.
दरम्यान, नेहा बोरा हिची सुटका झाली असली, तरी अभिजीत दीपके याला न्यायालयात हजर केल्यानंतर पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. CJP आणि AISA कडून SIR विरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.