२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (यूएफबीयू) पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपामुळे नागरिकांच्या बँकिंग सेवांच्या गरजांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे..
नवी दिल्ली : 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (यूएफबीयू) पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व बँका रविवारी, २७ सप्टेंबर रोजीही सुरू राहतील, असे अर्थ मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रातील ९० टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व असल्याचा दावा करणाऱ्या संघटनेने २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
आठवड्यातून ५ दिवस कामकाज ही त्यांची प्रमुख मागणी आहे. हा संप झाल्यास तो बँकिंग क्षेत्रातील सहामाही लेखाजोखा पूर्ण करण्याच्या कालावधीशी (३० सप्टेंबर) जुळून येईल. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपामुळे नागरिकांच्या बँकिंग सेवांच्या गरजांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
जनतेच्या बँकिंगविषयक महत्त्वाच्या गरजांवर दीर्घकाळ विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २७ सप्टेंबर रोजी - रविवारी नेहमीप्रमाणे कामकाज करतील, असे म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संबंधित शाखा आणि 'करन्सी चेस्ट' (रोख रक्कम साठवणूक केंद्रे) पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.