पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे (१५ हजार कोटी भारतीय रुपये) पॅकेज जाहीर केले. तसेच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यासह भारत-नेपाळ प्रवासी रेल्वेसेवेचा प्रारंभ केला..
नवी दिल्ली : दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सीमावादावरून काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर भारत-नेपाळ संबंधांना नव्याने दिशा देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.
दोन्ही पंतप्रधानांच्या व्यापक चर्चेनंतर परराष्ट्र सचिवांना सीमावादाच्या प्रलंबित मुद्द्यावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी बालेन शाह यांनी भारत-नेपाळ संबंध हिमालयाप्रमाणे दृढ आणि महासागराप्रमाणे विशाल असल्याची भावना व्यक्त केली.
नेपाळमध्ये भारताच्या आर्थिक मदतीने उभारण्यात आलेल्या ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रातील दोन प्रकल्पांचे दोन्ही नेत्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तसेच अन्य तीन प्रकल्पांची पायाभरणी केली. याशिवाय विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य विस्तारण्यावर सहमती दोन्ही नेत्यांनी सहमती केली.
परस्पर आदर, दृढ विश्वास आणि अखंड सद्भावना ही भारत-नेपाळ संबंधांची मूलभूत तत्त्वे आहेत. या अतुलनीय संबंधांच्या केंद्रस्थानी दोन्ही देशांचे नागरिक आहेत. भारत आणि नेपाळ यांचे संबंध हिमालयाप्रमाणे दृढ आणि महासागराप्रमाणे विशाल आहेत.
- बालेन शाह, पंतप्रधान, नेपाळ
भारत आणि नेपाळ यांचे संबंध केवळ शेजारी देशांमधील संबंध नाहीत, तर खोलवर रुजलेल्या आपुलकीच्या भावना आणि दृढ विश्वास आहे. आमची आव्हानेही सारखीच असतात. एकमेकांच्या प्रगतीचे भागीदार आणि अडचणीच्या काळात परस्परांना आधार देणारे देश म्हणून आम्ही उभे आहोत.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.