ज्यांच्या नावाने पत्रकार परिषद असते, संवाद त्यांच्याकडूनच व्हायला हवा. मुख्य व्यक्ती पत्रकारांशी संवाद साधत असताना बाजूला बसलेल्या व्यक्तींनी मध्येच हस्तक्षेप करणे योग्य नाही... अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे कान टोचले..
त्याचबरोबर पक्षातील सर्व सहकाऱ्यांना यापुढे जबाबदारीने वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी मध्येच हस्तक्षेप करत सुनेत्रा पवार यांना बोलू दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ जारी करत काँग्रेसने त्यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी दिल्लीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष समज दिली......“बीडच्या पत्रकार परिषदेत नक्की काय घडले, याची मला माहिती नाही. सुनेत्रा पवार या कर्तबगार, कणखर असून त्या संबंधित विषयांची मांडणी अगदी समर्पकपणे आणि योग्यपद्धतीने करू शकतात, हा विश्वास पक्षातील सर्व सहकाऱ्यांना आहे. सामाजिक, कला, क्रीडा, सहकार या क्षेत्रातील त्यांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्राने अनुभवली आहे. अशावेळी मुख्य व्यक्ती पत्रकारांना संबोधित करत असते, त्यावेळी बाजूला बसणाऱ्या व्यक्तीने बोलता कामा नये. कारण पत्रकार परिषद त्यांच्याच नावाने असते. त्यांनीच संवाद करणे हा त्यातील गाभा आहे,” असे तटकरे म्हणाले. त्यामुळे यापुढे आमचे सहकारी नक्कीच जबाबदारीने वागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल ज्या पद्धतीने अवमानकारक वक्तव्य करण्यात आले, ते केवळ एका व्यक्तीविरोधातील नव्हे तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानावर आघात करणारे आहे. हे विधान म्हणजे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, अशी टीकाही तटकरे यांनी यावेळी केली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.