राज्यात मान्सून दमदार; मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी; आगामी पाच दिवस धोक्याचे; पालघर, रायगडातील शाळा आज बंद..
राज्यात जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत मागील तीन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला असून बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि परिसराला तडाखा दिला. मंगळवार रात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावासामुळे सखल भागात पाणी साचले. या पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने वाहतूक मंदावली. रेल्वे उशिराने धावत असल्याने कामावर निघालेल्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील रेल्वे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही मंदावली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी बस वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. रेल्वे उशिराने त्यात रस्ते वाहतूकही मंदावल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतूक वळवण्यात आली.
येथे पाणी साचले
अंधेरी, सांताक्रूझ, खार, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, पवई, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, मानखुर्द, साकीनाका, विद्याविहार, दादर, परळ, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर, वडाळा आदी ठिकाणी पाणी तुंबले.
पडझडीच्या घटना :
मुसळधार पावसामुळे शहरात १२, पूर्व उपनगरात ९ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ४५ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच शहरात ४, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना नोंदविण्यात आल्या. याशिवाय, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ३ ठिकाणी भिंत किंवा घराचा काही भाग कोसळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.