घृणास्पद प्रकार.. घाटकोपर रेल्वे स्थानकात महिलांच्या शौचालयात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपी अटकेत..

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या महिला शौचालयात ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली..

सविस्तर वृत्त असे की, आपल्या १८ वर्षीय मुलीसोबत घरी जाण्यासाठी लोकलची वाट पाहणाऱ्या ६० वर्षीय महिलेवर स्थानकातील महिलांच्या शौचालयात लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेला मारहाणही करण्यात आली. गुरुवारी (दि. २६) रात्री घडलेल्या या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित महिला खडवली येथे राहते आणि कामानिमित्त घाटकोपरला येते. गुरुवारी रात्री ती आपल्या १८ वर्षीय मुलीसोबत कसारा लोकलने घरी जाण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकात थांबली होती. रात्री सुमारे ११.१२ वाजता ती फलाट क्रमांक २ आणि ३ दरम्यान सीएसएमटीच्या दिशेकडील टोकाला असलेल्या महिलांच्या सार्वजनिक शौचालयात गेली.

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यावेळी एका तरुणाने महिलेचा पाठलाग करत शौचालयात प्रवेश केला. त्याने आतून दरवाजा बंद करून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला मारहाण केल्याचाही आरोप आहे. या घटनेत महिलेच्या डोक्याला दुखापत झाली.

मुलीला सांगितला प्रकार; पोलिसांकडे धाव

रात्री सुमारे ११.२२ वाजता महिला शौचालयातून बाहेर आली. त्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार मुलीला सांगितला. दोघींनी फलाट क्रमांक ४ वरील लोहमार्ग पोलिसांच्या मदत केंद्राशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी मदतीसाठी पोहोचले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पीडितेकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, एक संशयित तरुण रात्री सुमारे ११.१९ वाजता शौचालयातून घाईघाईने बाहेर पडून घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या दिशेने जाताना दिसला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर शुक्रवारी (दि. २७) घाटकोपरमधील असल्फा परिसरातून तस्लीम नूर मोहम्मद (वय २५) याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील बलात्कारासंबंधीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

रेल्वे स्थानकातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, संबंधित महिला शौचालयात सुरक्षेसाठी कोणताही कर्मचारी तैनात नव्हता, त्यामुळे रेल्वे स्थानकातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी अशा ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे का, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुर्ला लोहमार्ग पोलिस करत आहेत.

60

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.