शब्द खड्गने काही पालक आणि सर्वसामान्यांशी या विषयावर चर्चा केली..
महाराष्ट्रातील 18 हजार मराठी शाळा बंद पाडून खाजगी शाळांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकार आणि तथाकथित पालकवर्ग प्रोत्साहन देत असल्याचे चित्र महाराष्ट्रभरात दिसत असले तरी आज सोमवार 15 जून 2026 रोजी 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रभरातील मराठी शाळा सुरु झाल्या आहेत. उन्हाळी सुट्टी संपल्या नंतर शाळेत छोट्या मुलांचे बागडणे आणि किलबिल ऐकायला मिळणार आहे.
शब्द खड्गने या संदर्भात काही पालक आणि सर्वसामान्यांशी चर्चा केली असता खूप वेगवेगळी मते कानी पडली..
पालकांच्या मते मराठी शाळा बंद पडायला नकोत असे म्हणणारे बहुतांश मराठी लोक आपली मुले इंग्रजी माध्यमांत शिकायला पाठवितात. देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप सरकार अत्यंत नालायक निघाल्याने फक्त शाळाच नाही तर या लोकांनी देश भांडवलदारांना विकून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करून टाकले आहे. पूर्वीचे नव्वद टक्के शिक्षक खूप प्रामाणिकपणे शिकवीत होते. मात्र, आताचे अल्पस्वल्प अपवाद वगळता खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक पोटार्थी आणि फक्त पगारापुरते असल्याने हे लोक मनलावून शिकवीत नाहीत. पाठपुस्तकां व्यतिरिक्त शिकविणे या लोकांना जमतच नाही. हे फक्त पाट्या टाकण्याची कामे करतात. दुपारची खिचडी, कपडे, वह्या, पुस्तके असे प्रलोभन दाखविले तरी शिक्षणाचा आणि शिकविण्याचा दर्जाच घसरला असल्याने पालक मराठी शाळेत मुलांना पाठवू इच्छित नाहीत. इंग्रजीचे स्तोम वाढविले असल्याने स्पर्धेत आपल्या मुलाने मागे पडू नये असे पालकांना वाटणे गुन्हा नाही. आणि म्हणूनच मराठी माध्यमातील शिक्षकांनी स्वतः स्मार्ट बनण्याची गरज आहे. काही पालकांनी असे सांगितले की कसे रहावे, कसे बोलावे या संदर्भात मराठी माध्यमातील शिक्षकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
इंग्रजी माध्यमांत फी जास्त असली तरी टापटीप आणि स्मार्ट टीचर, चांगल्या शाळा या गोष्टी पालकांचे लक्ष वेधून घेतात. अर्थात सगळ्याच इंग्रजी शाळा चांगल्या असतात असे मुळीच नाही. आणि सगळ्याच मराठी शाळा वाईट असतात असे तर मुळीच नाही. या बाबतील अनेक प्रश्न आहेत जे कधी समोर येतात तर कधी समोरच येत नाहीत. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना कुणी वाली उरलेला नाही. केव्हाही मातृभाषेतील शिक्षणच उत्तम असते. मात्र, भाजप सरकारने मराठी माध्यमांची गळचेपी सुरु केली आहे आणि याला फक्त सरकारच नाही तर पालक, शिक्षक आणि आपण जे मराठी असूनही एकमेकांशी सतत हिंदी-इंग्रजीत बोलतो या गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत.. मराठी शाळा अखेरची घटक मोजत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.