कविता कागदावर बोलत राहिली..

कविता कागदावर बोलत राहिली 

एक वास्तव आणि दुसरी

स्वप्नं सजवत राहिली..

पोटातली भूक वास्तव मांडत राहिली 

सखे तुला चंद्र आणून देतो

दुसरी बोलून गेली..

शब्दांनीच भूक भागवता आली तर

केवळ डोळ्यांनी वासना क्षमवता

आली असती तर

न बोलताही तिला भावना कळल्या

असत्या तर

वास्तव आणि स्वप्नं एकमेकांना पारखे

झाले नसते तर

सगळंच आलबेल असतं तर

तिने पोटासाठी देह विकला नसता

त्याने घामाच्या धारा फुटे पर्यंत

रस्ता खोदला नसता..

माझी कविता अनवाणी चालत राहिली

तुझी फुलांच्या पाकळ्यांवर

मी झेलले घाव काळीज, पायावर 

आणि पाठी पोटावर

तू स्तुती झेलत बिछाण्यावर

लोळत पडली..

खूप सा-यांनी काढली माझ्या कवितेत चूक

त्यांना कधीच दिसली नाही त्या पाठची भूक

त्यांची मजलच होती तेवढीच

त्यांनी झेलले नव्हते अंग तापवणारे ऊन 

ते शोधत गेले फक्त सुंदर चेहरे

आणि मी अकाली पडलेल्या चेहऱ्यावरच्या

सुरकुत्यां पाठची कारणं

शब्दांचं अग्निहोत्र अनेकांनी धगधगतं ठेवलं

कधी भांगेपोटी तुळस तर कुठे

काटेरी सावरीला शब्दफूल लगडलं..

पण माझी कविता कधीच कुणाला

शरण जाणार नाही

तुमच्या पसंतीची मोहोर उमटो न उमटो

तिला अजिबातच फरक पडणार नाही

बाहेर अंधार आहे हो असं तुम्ही

कितीही म्हणा

सूर्य उगवणं कधीच थांबणार नाही..

मी बोलतो उघडं नागडं सत्य

तुम्हाला हे वास्तव पटत नाही

मी बेखौफ व्यक्त होतो

कायम होत राहील आणि 

तुम्ही चोरून सारं करता

हे काय मला ठाऊक नाही..??

ना बुडूख ना शेंडा तुम्ही व्यक्त झालात

खूपदा चेहरे पाहून प्रसिद्ध झालात

मी मातीत घुसून माझी मुळं घट्ट केली

माझी कविता मातीत रूजत गेली

तुम्ही छापले पुस्तकांचे डोंगर

त्यावर तुमचे तुम्हीच फिरवले 

बेफाम स्तुतीचे सोनेरी नांगर

माझी कविता सारं काही दुरून 

पाहत होती

कारण तिची तडफड

अर्धा चतकोर भाकरीसाठीची होती

पोटासाठी लढणा-यांसाठीच होती..

माझी कविता अजूनही लढते आहे

तिला नकोत गोड गोड शब्द

तिला गुंतायचं नाही कुठल्या यमकात

तिला प्रसवायचा नाही कुठलाच

काव्यप्रकार

तिला मिरवायचं नाही कुठल्याच

समारंभात

तिला उजळवायचे आहेत उपाशी चेहरे

तिला बिंबवायचं आहे वास्तव

तिला दाखवायचा आहे प्रकाश

तिला जळायचं आहे अहोरात्र..

मी बरा तुमच्या कळपात नसलेला

मी बरा वेगळी वाट निवडलेला

मी बरा कुणालाच कुठलाच कधीच 

वशिला न लावलेला

आणि म्हणूनच मी मुक्त आहे म्हणूनच 

बेधडक बोलू लिहू शकतो

आलो असतो तुमच्या कळपात तर

तुम्ही वाघाचं मांजर केलं असतं..

पुन्हा तुमच्या कवितेने केलीय सुरूवात

शब्दांची रत्नं इत्यादी इत्यादी जमवण्याची

माझी कविता मात्र रोजगार शोधून देतेय

कारण पोकळ शब्दांनी पोट भरत नाही

हे ती पुरेपूर जाणते

आणि भूक माणसाला जगू देत नाही

हे ही ती जाणते

तुम्ही व्हा खूप मोठे वृक्ष मला आनंदच आहे

तुम्ही जिंका मानसन्मान मला आनंदच आहे

तुम्ही उधळा बिनधास्त मधाळ शब्दांचे कारंजे

मला आनंदच आहे पण

एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या मुळाशी

घट्ट रूजलो आहे

कारण मी मातीत मिसळलेली माती आहे

कारण मी वास्तव मांडत आहे

मी माझी मुळं ओढून घेतली तर..??

पुन्हा तुमची कविता चेह-यावर

रंगरंगोटी करीत आहे

कुठल्याशा पाॕश हाॕल मध्ये म्हणे

काव्य वाचन आहे

आणि माझी कविता स्मशानात आहे

तिथे रोज देवळाबाहेर बसणारा एक

वृद्ध भिकारी उपासमारीने मेला आहे..

- प्रा. दिपक जाधव..

59
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.