मैत्री कधी कुणाशी केव्हा होईल हे कुणालाच सांगता येत नाही.. मैत्रीत वय, लिंग, जात, देश, प्रांत इत्यादी इत्यादी कधीच अडथळा ठरत नाही.. मैत्री ही मैत्री असते आणि म्हणूनच ती रक्ताच्या नात्यापेक्ष जवळची आणि प्रसंगाला धावून येणारी असते. माझ्या आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी आहेत..
माझ्या मैत्रीत अगदी ऐशी वर्षांच्या म्हातारा म्हातारी पासून थेट चार सहा वर्षांची मुले सुद्धा आहेत.. पण, आज बोलणार आहे ते माझे परममित्र पोलीस उपनिरीक्षक विजय माधव तायडे यांच्या बद्दल.. तायडे साहेब अमरावतीचे आहेत.. त्यांची आणि माझी ओळख साधारणतः दिड वर्षांपूर्वीची.. ते डोंबिवली लोहमार्ग पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.. माझे अनेक स्त्री पुरुष पोलीस अधिकारी मित्र मैत्रिणी आहेत. पण तायडे साहेब थोडे हटके आहेत.. तायडे साहेब एलएलबी आहेत आणि ते खूप शांत, संयमी, सभ्य, मनमिळावू आणि आध्यत्मिक प्रवृत्तीचे आहेत. ही व्यक्ती शिक्षक किंवा कीर्तनकार असायला हवी होती असे मला खूपदा वाटून जाते..
तायडे साहेबांची आणि माझ्या मैत्रीची नाळ कधी जुळली हे नक्की सांगता येणार नाही. पण ते अगदी तोंड भरून मला दिपक सर असं बोलतात तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. माझ्या कार्यक्रमांत तायडे साहेब गाणी गायले आहेत.. ते इथे असतांना त्यांना खूप एकटं एकटं वाटायचं. कारण ते अमरावतीहून इकडे आलेले. इकडे कुणाची ओळख नाही आणि तिकडे अमरावतीत त्यांच्या दोन इंजिनीअर मुली ज्या एमपीएससी ची तयारी करीत आहेत.. आणि म्हातारी आई.. तिकडे त्यांचे भाऊ, नातेवाईक तायडे साहेबांच्या घराकडे लक्ष देत असले तरी तायडे साहेब शरीराने डोंबिवलीत आणि मनाने मात्र अमरावतीतच असतात.. त्यात तायडे साहेबांची बायपास सर्जरी झालेली आहे.. आणि याच त्यांच्या मानसिक अस्वस्थतेच्या काळात आमच्या सारख्या काही मित्रांनी आणि त्यांच्या कामातील सहकाऱ्यांनी त्यांना मानसिक साथ दिली. दिपक सर तुमच्यामुळे मला नेहमीच मानसिक आधार मिळालेला आहे असे तायडे साहेब नेहमीच बोलतात. तुमचा फोन नंबर बदलला तरी मला लगेच कळवा असेही ते मला नेहमी सांगतात. डोंबिवली सारख्या शहरात तुम्ही मला साथ दिली म्हणतात.. मुंबईची लोकं कामापुरती असतात कुणाला विशेष भाव देत नाहीत असा आमच्याकडे खूप लोकांचा समज आहे. मात्र, तो तुम्ही मोडीत काढला असे तायडे साहेब मला नेहमी बोलतात..
आज तायडे साहेबांबद्दल बोलण्याचे कारण असे की मेडिकल ग्राऊंडवर त्यांची अमरावती पोलीस स्टेशनला बदली झाली आहे. लवकरच ते डोंबिवली सोडतील. मनाला वाईट वाटते. पण, ते त्यांच्या माणसांत आई, मुलींजवळ जाणार हा आनंद आणि हे समाधान मला त्यांच्या पेक्षा जास्त आहे. त्यांच्या सोबत इथे डोंबिवलीत स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार असलेल्या सहचारिणी असूनही ते शरीराने इथे आणि मनाने तिथे अशी त्यांची अवस्था झाली होती. त्या अवस्थेला आता पूर्णविराम मिळणार आहे. ते मला नेहमी म्हणतात तुम्ही खूप दिलदार आणि मोठ्या मनाचे अहात तेव्हा मी त्यांना हसून म्हणतो एक मोठ्या मनाचा माणूस दुसऱ्या मोठ्या मनाच्या माणसाला भेटला म्हणून आपली मैत्री टिकली. तुम्ही कधी ही अमरावतीला या दिपक सर मी नागपूर अमरावती सर्व तुम्हाला फिरून दाखवेल असेही ते म्हणतात.. तायडे साहेब कुठेही असले तरी आमच्यातला जिव्हाळा कायम राहील हे सांगण्याची गरज नाही.. तायडे साहेब तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेछया..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.