लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची ‘एनआयए’सह चार तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या छपरावरून विमानाचा ब्लॅक बॉक्स (डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर) ताब्यात घेण्यात आला. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताचे कारण शोधण्यास मोठी मदत होणार आहे..
अहमदाबाद : लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची ‘एनआयए’सह चार तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या छपरावरून विमानाचा ब्लॅक बॉक्स (डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर) ताब्यात घेण्यात आला. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याने अपघाताचे कारण शोधण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट देऊन अपघाताचा आढावा घेतला व जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर (एआय १७१) विमानात एकूण २४२ प्रवासी व कर्मचारी होते, त्यातील फक्त एक जण वाचला आहे. याशिवाय, निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहामधील २४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये पाच ‘एमबीबीए’च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांतच कोसळले आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या आवारात आदळल्यानंतर जळून खाक झाले.
‘एएआयबी’च्या निवेदनानुसार, विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला, जिथे विमानाचा शेपटीचा भाग अडकलेला होता. ‘डीएफडीआर’ सामान्यतः विमानाच्या शेपटीच्या भागात असतो आणि तो सहज सापडावा म्हणून तो संत्री रंगात रंगवलेला असतो.
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितले की, अपघातानंतर २८ तासांच्या आत ‘डीएफडीआर’ जप्त करण्यात आला आहे. ही तपासाच्या दृष्टीने एक मोठी प्रगती आहे.
‘सीव्हीआर’ अद्याप सापडलेला नाही
‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’बद्दल (सीव्हीआर) मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा रेकॉर्डर वैमानिकांमधील संभाषण, इंजिनचा आवाज व इतर रेडिओ संवाद रेकॉर्ड करतो.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.