छठपूजेसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांच्या मायक्रोबसला गुरुवारी नेपाळमध्ये भीषण अपघात झाला..
काठमांडू : छठपूजेसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांच्या मायक्रोबसला गुरुवारी नेपाळमध्ये भीषण अपघात झाला. डोंगराळ रस्त्यावरून बस ३०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात गुरुवारी पहाटे ५.४५ च्या सुमारास बागमती प्रांतातील मकवानपूर जिल्ह्यात झाला. जिल्हा पोलीस कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मायक्रोबस काठमांडू येथून सर्लाही जिल्ह्याकडे जात होती.
त्यावेळी भीमफेदी ग्रामीण नगरपालिकेतील भीमफेदी-कुलेखानी-काठमांडू रस्त्यावरील डोंगराळ भागात ती सुमारे ३०० मीटर खाली कोसळली. या भीषण अपघातात चालकासह १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघातातील सहा जखमी प्रवाशांना उपचारासाठी हेटौंडा नगरपालिकेतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रविवारी येणाऱ्या छठ सणासाठी काठमांडूहून सर्लाही जिल्ह्यातील आपल्या घरी परतत असलेले रहिवासी या वाहनातून प्रवास करत होते.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.