शिंदे सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डॉ. वैभव साळुंखे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर आणि परिचारिका नमिता उबाळे तथा दिव्या गिरी यांना केलेल्या मारहाणीचा म्हात्रेंचे हितसंबंधी वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे..
काय होती घटना :
सोमवारी संध्याकाळी डोंबिवलीतील एका गरोदर महिलेचे शास्त्रीनगर रुग्णालयात सिझेरिअन झाले. मात्र, बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळलेली असल्याने व क्रिटिकल अवस्था असल्याने या बाळाला पुढे घेऊन जा आपल्याकडे व्यवस्था नाही असे येथील डॉक्टरांनी सांगितल्याचे समजते. येथील प्रमुख डॉ. सादिया पिंजारी यांनी सुद्धा माध्यमांशी बोलतांना बाळ क्रिटिकल होते असे सांगितले आहे.. मग या महिलेचे नातेवाईक त्याच विभागाचे शिंदे सेनेचे नगरसेवक असलेल्या रमेश म्हात्रे यांना जाऊन भेटले. म्हात्रे यांनी हॉस्पिटल मध्ये फोन केला मात्र त्यांचा फोन कुणी उचलला नाही म्हणून ते रागावले व शास्त्रीनगर रुग्णालयात येऊन त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज अख्या महाराष्ट्राने न्युज चॅनेल तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले.
या संदर्भात डोंबिवलीतील लोकांशी चर्चा केली असता कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेच्या हॉस्पिटलात काहीच सुविधा नाही. येथील कर्मचारी व स्टाफ तपासणीसाठी आलेल्या पेंशन व त्यांच्या नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे देतात आणि बरे झाले या वैद्यकीय स्टाफला चोप दिला असे काही लोक म्हटले. तर फार मोठ्या प्रमाणात लोकांनी वैद्यकीय स्टाफची बाजू घेतली. भांडायचं आणि मारायचंच होता तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांना मारा, आयुक्तांना जाब विचारा कारण पालिकाच जर सुविधा पुरवत नसेल तर डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ तरी काय करणार असे लोक म्हटले. याच दरम्यान कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांनी सुद्धा या मारहाणी विरोधात कडक भूमिका घेतली नसल्याचे दिसल्याने काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकणी यांनी आयुक्त आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांची जोरदार टीका केली. डॉक्टर संघटनेने या घटनेचा जाहीर निषेध करून रमेश म्हात्रे व त्यांच्या तथाकथित समर्थकांविरोधात पोलिसांत तक्रार केली. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की सगळ्या व्हिडिओज मध्ये रमेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक जोरदार मारहाण करतांना दिसत असतांनाही काही चॅनेल आणि दस्तुरखुद्द डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे यांनी नगरसेवकाचे डायरेक्ट नाव घेणे टाळले.. दस्तुरखुद्द शिंदे गटाचे कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून असे सांगितले की आम्ही प्रकरणाचा तपास करून कडक कारवाई करू.. मी स्वतः डॉक्टर असल्याने मला समस्या ठाऊक आहेत इत्यादी इत्यादी. प्रश्नोत्तराच्या वेळी सुद्धा विरोधी पक्षाने या बाबत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार व डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र, आता ते राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने म्हात्रे यांचे काय करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. रमेश म्हात्रे यांची परिसरात खूप दहशत आहे हे सर्व डोंबिवलीकरांना ठाऊक आहे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सीसीटीव्हीत म्हात्रे मारहाण करीत असतानाचे दिसत असूनही एसीपी सुहास हेमाडे यांनी त्यांचे नाव घेणे टाळले याचा अर्थ पोलीस सुद्धा म्हात्रे आणि ते सध्या असलेल्या सत्ताधारी शिंदे सेनेला घाबरत आहेत का असा बाहेर लोक प्रश्न विचारीत आहेत. इथे जर सर्वसामान्य लोकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली असती अथवा डॉक्टरांना मारहाण केली असती तर पोलिसांनी या लोकांची धिंड काढून या सामान्य लोकांना फोडून काढले असते. मग आता काय झाले ? असा संतप्त सवाल सामान्य जनता विचारीत आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे जरी आम्ही प्रकरणाची तपासणी करून कठोर कारवाई करू म्हणत असले तरी म्हात्रेंना काहीच होणार नाही हे डोंबिवलीकर जाणून आहेत. त्यांनी या पूर्वीही अनेक अशीच प्रकरणे केली आहेत त्यांना जाब विचारणारे कुणी नसल्याने ही प्रवृत्ती बळावली असल्याचे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे. उद्या कुणीही उठून उच्च शिक्षित डॉक्टरांना आणि पत्रकारांना मारहाण करतो प्रसंगी जीव घेतो आणि शासन आणि त्यांचे पोलीस गंमत बघत राहतात असा संदेश या घटनेने जनतेत पोहोचला आहे.. प्रत्येक वेळी उठसूट कुणालाही मारहाण करणे हा पर्याय नसल्याचे मत डोंबिवलीतील बऱ्याच सुशिक्षित मंडळींनी मांडले आहे..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.