निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे..
ठाणे : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी राज्यनिहाय आंदोलनाची रणनीती आखण्यात आली असून, हा मुद्दा पूर्ण ताकदीने लावून धरला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी ठाण्यात सांगितले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
निवडणुकीतील गैरप्रकार हा आता केवळ राजकीय मुद्दा राहिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. संबंधितांना माहिती न देता निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतला. हा प्रकार नियम आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही, असा आरोप सुळे यांनी केला.
महागाई कमी झालीच पाहिजे
कल्याण : महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कल्याण-मुरबाड रोडवरील कांबा येथील मोनालिसा हॉलमध्ये आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
‘प्रश्न विचारू देत नसतील तर मतदान कशासाठी?’
निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या विरोधकांना रोखले जात असल्याचा आरोपही सुळे यांनी केला. गांधी कुटुंबीयांना निवडणूक आयोगाची भेट घेण्यापासून रोखले जात असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
‘मनमानी कारभार चालणार नाही’
घटनात्मक संस्थांनी नियम आणि कायद्याच्या चौकटीत काम करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्येकजण मनमानी पद्धतीने निर्णय घेऊ लागला, तर नियम, कायदा आणि संविधानाचे महत्त्व काय उरणार, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही इंडिया आघाडीची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.