राज्यात तापमान ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्णतेचा कडाका वाढला आहे. मात्र हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे..
मार्चमध्येच तापमान चाळीशीपार
यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांत तापमानाने चाळीशी गाठली आहे. विदर्भातील अकोला येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल होत असून काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील काही भागांत अधूनमधून पाऊस झाला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यासाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही भागांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.