कांद्याचा भाव कोसळला.. पाच दिवसांत प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये निराशा..

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांदा नगरी लासलगाव बाजार समितीत पांच दिवसात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण झाली आहे..

लासलगाव : देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांदा नगरी लासलगाव बाजार समितीत पांच दिवसात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत असून त्याचा फटका देशांतर्गत बाजारभावाला बसत असल्याचे व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.

लासलगाव बाजार समितीत गेल्या बुधवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५७०० रुपयांचा दर मिळाला होता. पांच दिवसात दरात मोठी घसरण होऊन मंगळवारी कमाल दर ४ हजार ८७१ रुपयांपर्यंत घसरला आहे. कांदा उत्पादनासाठी मोठा खर्च आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे.

लासलगाव बाजार समितीत आज ४८३ वाहनांमधून ६०९२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान १३११ रुपये, तर कमाल ४७८१ रुपये सरासरी ४२५० बाजार भाव मिळाला.

उन्हाळ कांद्याला किमान १ हजार रुपये, कमाल ४१८१ रुपये सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.

पांच दिवसात लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपये, तर सरासरी दरात ४५० रुपये आणि उन्हाळ कांदा किमान दरात ३५४ रुपये सरासरी दरात २०० रुपयांनी कोसळले आहे.

उत्पादन खर्च भरून निघणे कठीण

एकीकडे पाण्याअभावी कांद्याचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याच्या दरात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

48
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.