महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, त्याचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तावेजीकरण करण्यासाठी 'Bappa.org' हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे..
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, त्याचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तावेजीकरण करण्यासाठी 'Bappa.org' हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या डिजिटल संग्रहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घराघरातील गणेशोत्सवाचीही नोंद केली जाणार आहे. घरगुती गणपतींच्या पारंपरिक प्रथा, सजावट, लोककला, गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी तसेच मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना या संग्रहात स्थान मिळणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचा चांगल्या दर्जाचा फोटो आणि गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या दोन ते चार ओळी Bappa.org या मंचावर पाठवाव्यात.
प्राप्त माहितीची तज्ज्ञ समितीमार्फत पडताळणी करून संबंधित योगदानकर्त्याच्या नावासह अधिकृत नोंद क्रमांक दिला जाणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचा कायमस्वरूपी डिजिटल संग्रह तयार होणार असून, तो भावी पिढ्यांसाठी महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज ठरणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.