विजयादशमीला देवीला फुले व हार अर्पण करण्यासह घरांची दारे, वाहने सजविण्यासाठी आणि पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडू, अष्टर आणि शेवंतीच्या फुलांना मागणी आहे. यंदाच्या दुष्काळाचा फुलशेतीलाही फटका बसला आहे. पावसाअभावी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे झेंडूची अनेक झाडे सुकली. मात्र, उपलब्ध विहिरींमधून बादलीने पाणी आणून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात फुले वाचवली. या फुलांची विक्री करण्यासाठी उंडणगाव येथील शेतकरी शहरात दाखल झाले आहेत.
सध्या बाजारात झेंडूची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने होत असून, फुलांचे हार आणि माळांची किंमत ८० ते १०० रुपये प्रतिनग आहे. उंडणगाव येथून मॅटॅडोरमधून सुमारे १५ क्विंटल फुले विक्रीसाठी आणल्याची माहिती विक्रेते ज्ञानेश्वर कोरडे यांनी दिली.
दुष्काळाच्या संकटातही फुलांची शेती टिकवून सणासाठी फुले उपलब्ध करून देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न दिसून येत आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.