पैशा अभावी शस्त्रक्रिया थांबणार नाहीतमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन..

आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरीबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिरात रविवारी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. फिरता दवाखाना, रुग्णवाहिका यांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दिव्यांगांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हील चेअरचे वितरण करण्यात आले. अनेक संस्थांतर्फे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरला देणगी आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. हे सर्व दाते तसेच महाशिबिराच्या आयोजनात सहभागी डॉक्टरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

समाजातील शेवटच्या घटकाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या हाच या शिबिराचा उद्देश असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाने घेतले. रुग्णालयांची संख्या वाढवली. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आधी जे गंभीर आजार नव्हते, ते समाविष्ट केले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे ५७ हजार रुग्णांना ४५२ कोटी रुपये उपचारांसाठी उपलब्ध करून दिले.

सर्व धर्मादाय रुग्णालयातील खाटा गरिब रुग्णांसाठी राखीव असल्या पाहिजे, यासाठी डिजिटल पद्धती निर्माण केली.जवळपास १० आजार असे आहेत की, जे योजनेच्या ५ लाखांच्या मर्यादेत बसू शकत नाही, त्यामुळे त्यासाठी ९ लाखांपर्यंत, तर काही आजारांच्या बाबतीत ३५ लाख रुपयांपर्यंत मदत करण्याचे शासनाचे धोरण असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अजित गोपचडे, आमदार प्रवीण दटके, संजय भेंडे, मोहन मते, राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दिव्यांगांना कृत्रिम पाय-हातांचे वितरण

ऐकू न आल्यामुळे बोलता न येणाऱ्या मुलांची समस्या लक्षात घेता लहान मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया निःशुल्क सुरू केल्या. त्यामुळे ही मुले ऐकू शकतील व बोलूही शकतील. पुढच्या पिढीत कोणीही मूकबधिर असणार नाही, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. दिव्यांग बांधवांना ९ ऑगस्टला कृत्रिम पाय-हात यांचे वितरण केले जाणार आहे. गरिबांना मदत करून समाज निरोगी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

38
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.