डोंबिवली, 27 नोव्हेंबर : वयाच्या अवघ्या ९ वर्षे ५ महिन्यांत कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळविण्याचा मान गर्व शर्मा याने संपादन केला आहे. एवढ्या लहान वयात मिळवलेले हे यश त्याच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा असून, त्याच्या जिद्दीचे, शिस्तीचे आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक होत आहे..
गर्वने १२ जानेवारी २०२२ रोजी इंडियन स्कूल ऑफ सेल्फ डिफेन्स (P.K.K.P.S. Regd.) येथे कराटे प्रशिक्षणास सुरुवात केली. प्रशिक्षक वसंत गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिमा हॉल, एमआयडीसी, डोंबिवली येथे त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.
प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासूनच गर्वने कराटेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण जपले आहे. त्याच्या प्रशिक्षणातील तब्बल ९८ टक्के उपस्थिती ही त्याच्या नियमितपणाची आणि मेहनतीची साक्ष देते. विविध कराटे स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने अनेक पदकेही पटकावली आहेत.
प्रशिक्षक वसंत गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गर्वने एका नवशिक्या विद्यार्थ्यापासून कुशल कराटेपटूपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. वयाच्या नवव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळविण्याची त्याची कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून, बालवयातच शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्द जोपासण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
गर्वच्या या यशामुळे त्याचे कुटुंबीय, प्रशिक्षक, इंडियन स्कूल ऑफ सेल्फ डिफेन्स आणि डोंबिवलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गर्व शर्मा : क्रीडा आणि कलाक्षेत्रातील बहुगुणी बालप्रतिभा कराटेपुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता गर्वने क्रिकेट, बुद्धिबळ आणि नृत्य अशा विविध क्षेत्रांतही आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. गर्व आणि त्याचा मोठा भाऊ आरांश हे होमस्कूलिंग पद्धतीने शिक्षण घेत आहेत. या लवचिक शिक्षणपद्धतीमुळे त्यांना शालेय अभ्यासासोबतच क्रीडा आणि इतर आवडीच्या उपक्रमांसाठी वेळ देता येतो. याचाच लाभ घेत गर्वने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी कराटे आणि क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले.
क्रिकेटमध्येही गर्वची कामगिरी उल्लेखनीय आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने पहिला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावला. त्यानंतर आठव्या वर्षी 'बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज' हा पुरस्कार मिळवला. याच वयात एका टेस्ट मॅचमध्ये पुन्हा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवून त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
बुद्धिबळाच्या पटावरही गर्वने आपली छाप उमटवली आहे. वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने आतापर्यंत अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. खेळांसोबतच त्याला नृत्याचीही विशेष आवड असून, गेल्या दोन वर्षांपासून तो आगरी महोत्सव आणि कोकण महोत्सवात सहभागी होत आहे.
अभ्यास, कराटे, क्रिकेट, बुद्धिबळ आणि नृत्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्साहाने सहभाग घेणारा गर्व हा बहुआयामी बालप्रतिभेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
लहान वयातच विविध क्षेत्रांत यश मिळवणाऱ्या गर्वचा प्रवास हेच अधोरेखित करतो की, योग्य मार्गदर्शन, शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रोत्साहन मिळाल्यास वय ही यशाच्या मार्गातील अडचण ठरत नाही.
संपर्क –
मिसेस शर्मा.. ९८१९१६८१९२/७०४५२९७६३८
- नमिता दोंदे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.