मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पटेल चौकापासून जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढणाऱ्या सुमारे १५० आंदोलकांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले..
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पटेल चौकापासून जंतरमंतरपर्यंत मोर्चा काढणाऱ्या सुमारे १५० आंदोलकांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये ऐसाच्या (एआयएसए) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा, कार्यकर्ते योगेंद्र यादव आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा समावेश आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
ऐसाच्या सदस्यांनी सांगितले की, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, नित्या रामकृष्णन, पल्लव सिसोदीया आणि प्रशांत भूषण तसेच कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी नेहा बोरा आणि इतर विद्यार्थी आंदोलकांसोबत या मोर्चात सहभाग घेतला होता. आंदोलक जंतरमंतरच्या दिशेने एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर जंतरमंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आले असून विविध ठिकाणी मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलन सुरूच राहणार
शुक्रवारी संध्याकाळी एका व्हिडिओ संदेशात नेहा बोरा यांनी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते आणि कार्यकर्त्यांना पुन्हा जंतरमंतरवर जमण्याचे आवाहन केले होते. या कारवाईमुळे आंदोलक घाबरणार नाहीत, असे सांगत त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लढा चालू ठेवण्याचे आवाहन केले.
गैरव्यवहाराचे आरोप
पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका पुरुष पोलिस अधिकाऱ्याने नेहा बोरा यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आणि दुसऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप ऐसाच्या सदस्यांनी केला आहे. शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांपैकी एक असलेल्या नेहा बोरा यांनी दुपारी १ वाजता पुन्हा जंतरमंतरवर जमावे आणि निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी तसेच मतदारयाद्यांच्या 'एसआयआर' प्रक्रियेवरील आक्षेपांसंदर्भात आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर हे नवे आंदोलन पुकारण्यात आले.
शुक्रवारी जंतरमंतर व परिसरापोलिस आणि निमलष्करी दलांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना रोखत सुमारे १,००० आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अनेकांना सोडून देण्यात आले. शुक्रवारच्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी) संसद मार्ग आणि कनॉट प्लेस पोलिस ठाण्यात किमान तीन गुन्हे दाखल केले आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेची आरोपी म्हणून नावे नमूद करण्यात आलेली नाहीत, परंतु निदर्शनांचे आयोजन करणाऱ्या किंवा त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती व संघटनांच्या तपशीलांचा त्यात उल्लेख आहे.
शुक्रवारच्या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली होती आणि मध्य दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. अनेक रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले होते आणि जंतरमंतर परिसरातील अनेक मेट्रो स्थानकांचे प्रवेश व निर्गमद्वार तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशीही जंतरमंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त कायम होता, तर ऐसा आणि इतर संघटनांनी आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.