गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का..

गेल्या काही दिवसांपासून गाजत ‘गोकुळ’ दूध संघाच्या सत्तासंघर्षाचा फैसला अखेर मंगळवारी लागला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांची अधिकृतरित्या निवड झाली..

गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. निवडणुकीत बहुमत असूनही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला पराभव पत्करावा लागला.

मंगळवारी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या मतदान प्रक्रियेत राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत बाजी मारली, तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांची मते विजयासाठी अत्यंत निर्णायक ठरली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील, तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर रिंगणात होते. मतदानासाठी महायुतीचे संचालक पिवळे फेटे बांधून आले होते. दोन्ही गटांच्या संचालकांनी मतदान करण्यापूर्वी गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. एकूण २९ सदस्यांनी मतदान केले (२५ निर्वाचित आणि ४ शासन नियुक्त). न्यायालयाच्या आदेशानुसार, २५ निर्वाचित सदस्यांची मते एका मतपेटीत आणि शासनाने नियुक्त केलेल्या ४ सदस्यांची मते दुसऱ्या स्वतंत्र मतपेटीत सीलबंद ठेवण्यात आली होती. नियमानुसार, २५ निर्वाचित सदस्यांमधून स्पष्ट बहुमत मिळाल्यास ४ सीलबंद मतांची मोजणी होणार नव्हती. मात्र, निकालात शासन नियुक्त ४ संचालकांची मते निर्णायक ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.

महायुती प्रत्येकी सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद वाटून घेणार

महायुतीकडून गोकुळच्या अध्यक्षपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांना अध्यक्षपदाची संधी मिळणार असून, गोकुळच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांसाठी वाटून घेतला जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत तीन किंवा चार अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते. भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे.

40
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.