पंढरपूर जवळील जळोली येथे बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू.. रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी..

सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे दीड वर्षांची उष्मती गावित बंद बोअरवेलमध्ये पडून मृत्युमुखी पडली. रात्रभर बचावकार्य सुरू होतं. जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाला शासकीय मदत देण्याचं सांगितलं आहे..

पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे रविवारी (दि. २२) ही घटना घडली. उष्मती राहुल गावित असं मृत चिमुकलीचं नाव असून, ती मूळची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिसा येथील रहिवासी होती. उष्मतीचं कुटुंब ऊसतोड मजुरीसाठी या परिसरात आलं होतं. शेतात ऊसतोडीचं काम सुरू असताना सकाळच्या सुमारास उष्मती दिसेनाशी झाली. कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली. मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर करकंब पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. रात्री सुमारे ८ वाजता शेतातील बंद बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून पाहणी करण्यात आली. त्यावेळी कॅमेऱ्यात एका लहान मुलीचा हात दिसला. त्यामुळे उष्मती बोअरवेलमध्ये अडकल्याचं स्पष्ट झालं. ही बोअरवेल अंदाजे ४५ ते ५० फूट खोल असल्याची माहिती आहे.

चिमुकलीला वाचवण्यासाठी रात्रभर धडपड

उष्मती बोअरवेलमध्ये अडकल्याचं समजताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मुलीला बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह करकंब पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या एनडीआरएफच्या पथकालाही बचावकार्यासाठी बोलावण्यात आलं. आवश्यक यंत्रसामग्री पुण्याहून मागवण्यात आली. ही यंत्रसामग्री रात्री सुमारे २ वाजता घटनास्थळी पोहोचली. प्रशासन, पोलिस आणि बचाव पथकांनी रात्रभर चिमुकलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

मृत मुलीच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार

या घटनेनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी गावित कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच शासनाच्या नियमानुसार मृत मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बोअरवेल गेल्या २० वर्षांपासून बंद असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. एवढ्या वर्षांपासून बंद असलेल्या बोअरवेलमध्ये चिमुकली नेमकी कशी पडली, याचा पोलिसांकडून तपास केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बंद बोअरवेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे शेतांमधील बंद आणि वापरात नसलेल्या बोअरवेलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. संबंधित बोअरवेलचं तोंड उघडं का होतं आणि तिच्या सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

36
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.