ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे..
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणात झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मनसेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि पदाधिकाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
२८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला जेवणाचे ताट दिले होते. रुग्ण जेवण घेत असताना ताटातील अन्नामध्ये झुरळ दिसून आले. हा प्रकार समोर येताच वॉर्डातील रुग्णांमध्ये तीव्र संताप उसळला. घटनेची माहिती मिळताच अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ वॉर्डात धाव घेऊन पाहणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. कळवा रुग्णालयात दररोज हजारो सामान्य नागरिक उपचारासाठी दाखल होतात. येथे दररोज सुमारे १ हजाराहून अधिक रुग्णांना जेवण पुरवले जाते.
गुन्हे दाखल करण्याचा इशारा
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणारा हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या प्रकरणी संबंधित जेवण पुरवठादार ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर तसेच जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे मनसेचे जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी सांगितले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.