बदलापूर शहरात उघडकीला आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीज विक्री प्रकरणी आता नाशिक येथील एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा या डॉक्टरला अटक करण्यात आली असून ही या प्रकरणातील सहावी अटक आहे..
अवैधरित्या स्त्री बीज विक्रीचे प्रकरण बदलापुरात समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या रॅकेटमधील गुन्हेगारांच्या अटक करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी नाशिक येथील डॉक्टरला अटक केली. त्याला चिखलोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तीन महिला, औषध विक्रेत्याला अटक
पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी तीन महिलांना व एका औषध विक्रेत्याला अटक केली आहे. त्यातील एक महिला सोनोग्राफी केंद्रात काम करीत होती. तर विठ्ठलवाडी येथील विक्रेता कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय स्त्री बीजासंबंधीची औषधे देत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात डॉक्टरांचाही सहभाग आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.