माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला काळे फासू - राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय काकडे यांनी आक्रमक भूमिका..

सुनेत्रा पवार यांच्यावर अश्लाघ्य टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी २४ तासांत माफी मागावी किंवा त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कुठेही काँग्रेस नेत्यांना फिरू देणार नाहीत आणि त्यांच्या तोंडाला काळ फासतील.. 

पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या सोशल मीडिया अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखावरून माजी खासदार संजय काकडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर अश्लाघ्य टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी २४ तासांत माफी मागावी किंवा त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कुठेही काँग्रेस नेत्यांना फिरू देणार नाहीत आणि त्यांच्या तोंडाला काळ फासतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी बुधवारी येथे दिला.

संजय काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार या एका कठीण कौटुंबिक आणि राजकीय प्रसंगातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राहिलेली स्वप्ने आणि राज्याच्या विकासाची कामे पूर्ण करण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. अशा संवेदनशील काळात एका महिलेला अत्यंत घाणेरड्या उपमा वापरून तिची बदनामी करणे, ही काँग्रेसची कोणती संस्कृती आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राहुल गांधींना साकडे

संजय काकडे यांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. ते म्हणाले की, जेव्हा भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले जाते, तेव्हा राहुल गांधी त्वरित त्यावर प्रतिक्रिया देतात आणि महिला सन्मानाची भाषा करतात. मग आता त्यांच्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष एका महिलेबद्दल इतके हीन विधान करत असताना ते गप्प का आहेत? 

शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे

काकडे यांनी या वादाचा धागा पकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही एक आवाहन केले आहे. काकडे म्हणाले की, ज्या महाविकास आघाडीमध्ये आपल्याच घरातील सुनेचा असा जाहीर अपमान केला जातो, त्या आघाडीत राहून शरद पवारांनी आपली प्रतिष्ठा का पणाला लावली आहे? 

सुनेत्रा पवार महाराष्ट्रातील ‘इंदिरा गांधी’ म्हणून उदयास येतील

सुनेत्रा पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाची आणि त्यांच्यावरील टिकेची तुलना करताना काकडे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे इंदिरा गांधी यांनी आपल्या कामातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले होते, त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारदेखील येणाऱ्या काळात स्वकर्तृत्वाने महाराष्ट्रातील ‘इंदिरा गांधी’ म्हणून उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

44
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.