पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान इमारतीचा भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे..
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे सुरू असलेल्या वेस्ट-टू-एनर्जी (कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान बुधवारी (दि. ०८) दुपारी मोठी दुर्घटना घडली. बांधकामाधीन इमारतीचा एक भाग अचानक कोसळल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (पीसीएमसी) वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारला जात आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवता यावे यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
घटनास्थळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही पोहोचले असून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बांधकाम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.