भारतभरात कॉकरोच जनता पार्टीला प्रोत्साहन मिळू लागले आहे..

पुण्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींना वाचा फोडण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने एक लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. NEET पेपरफुटी प्रकरणावर देशभरात संताप व्यक्त होत असताना, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली..

या आंदोलनात समाजसेवक सोनम वांगचूक, चळवळीचे मुख्य समन्वयक अभिजित दीपके, वकील असीम सरोदे, विश्वम्भर चौधरी, नामदेवराव जाधव, दिव्या शिंदे सरकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबतच मोठ्या संख्येने तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाच्या सुरुवातीला हैदराबाद विद्यापीठातील दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर विद्यार्थ्यांच्या हिताच्या पाच महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या:

पेपरफुटीमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ₹10,000 आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी.

परीक्षा घेण्यासाठी टेंडर मिळवणाऱ्या कंपन्यांचे कठोर ऑडिट करण्यात यावे आणि मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींना अशा टेंडर्समध्ये प्राधान्य दिले जाऊ नये.

सर्व परीक्षांचे निकाल निश्चित कालमर्यादेत जाहीर करण्यात यावेत.

परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्याचा विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च शासनाने उचलावा.

NCERT च्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा.

यावेळी अभिजित दीपके यांनी इशारा दिला की, जर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर 20 जून रोजी दिल्लीत मोठं आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, तरुणांनी हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला बळी न पडता शिक्षण, रोजगार आणि संविधानिक हक्कांच्या प्रश्नांवर एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.

47
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.