मुसळधार पावसामुळे कर्जत-लोणावळा रेल्वे घाट विभागात ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान भूस्खलन झाले..
मध्य रेल्वेने १७ रेल्वेगाड्या रद्द केल्या. तर, ३१ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच अनेक गाड्या अंशतः रद्द करण्यात आले. कर्जत लोणावळा घाटात काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. ४ जुलै रोजी १६२ मिमी, ५ जुलै रोजी तब्बल ३२७ मिमी आणि ६ जुलै रोजी अवघ्या चार तासांत १४० मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे रविवारी रात्री सुमारे ३.०५ वाजता ठाकूरवाडी आणि मंकी हिलदरम्यान दरड कोसळून रेल्वे मार्ग बाधित झाला.
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मुंबई ते पुणे मार्गावरील बहुतांश गाड्यांचा समावेश होता. त्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण-इगतपुरी-मनमाड-दौंड; तसेच सुरत-पालधी-जळगाव-मनमाड या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्या. तर काही रेल्वेगाड्या पुणे, लोणावळा, पनवेल, दौंड, खडकी, कर्जत, इगतपुरी आणि वसई रोड येथेच अंशतः रद्द करण्यात आल्या आणि तिथूनच परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. याशिवाय काही रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल केला. लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड एक्स्प्रेस आणि दौंड-इंदूर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने रवाना होण्याची उद्घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.