काही माणसं त्यांच्या संपर्कातील लोकांना सर्वतोपरी फुलविण्याचा प्रयत्न करतात. रामदास काकडे हे अशाच प्रकारचे तरुण उद्योजकांच्या मनात समई प्रमाणे अखंड तेवत राहणारे व्यक्तिमत्व आहे..
तळेगाव दाभाडे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या उद्योजकीय प्रवासाचे आणि मावळच्या तरुणांसाठी त्यांनी दाखवलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
मावळच्या ग्रामीण भागातील शेतकरी, तरुण, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “बनेगा गाव में, बिकेगा शहर में” हा मूलमंत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज स्थापन करण्याची संकल्पना आपण मांडली असल्याचे अभिजीत आपटे यांनी सांगितले.
“मावळच्या शेतकरी, तरुण आणि माय-माऊलींसाठी ही संकल्पना घेऊन मी गेल्या एक वर्षभर अनेक नेत्यांचे उंबरे झिजवले; मात्र या उपक्रमाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. परंतु उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्याकडे ही संकल्पना मांडताच त्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन तिचे महत्त्व समजून घेत सहकार्याची तयारी दर्शवली, हा माझ्यासाठी विशेष समाधानाचा आणि कौतुकाचा विषय आहे,” असे आपटे यांनी स्पष्ट केले.
आपटे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असूनही रामदास आप्पा काकडे यांनी पक्षीय भेद न ठेवता या संकल्पनेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. रणजितदादा काकडे यांच्याशीही या विषयावर चर्चा झाली. मावळच्या तरुणांना, शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना उद्योग-व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सकारात्मक दृष्टिकोनाची आज गरज आहे.”
“एक उद्योजक जेव्हा दुसऱ्या उद्योजकाच्या कार्याचा सन्मान करतो, तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो,” असे सांगत आपटे यांनी काकडे यांच्या उद्योजकीय वाटचालीचे कौतुक केले.
मावळमध्ये अनेक गुणवंत तरुण असून त्यांच्यात उद्योजक होण्याची क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन, भांडवल, बाजारपेठ आणि उद्योगविश्वाशी संपर्क मिळाल्यास मावळच्या मातीतून हजारो उद्योजक घडू शकतात. त्यामुळे उद्योग क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची आणि त्यांच्या अनुभवाचा नव्या पिढीला उपयोग करून देण्याची गरज आहे, असेही आपटे यांनी सांगितले.
“राजकीय मतभेद असू शकतात; मात्र विकासाच्या विषयांवर राजकारणापलीकडे जाऊन एकत्र येणे आवश्यक आहे. उद्योजकांविषयी समाजात चुकीचा संदेश जाईल अशा पद्धतीने होणाऱ्या टीकेचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर होत नाही, तर त्या परिसरातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या वातावरणावरही होऊ शकतो. त्यामुळे मावळच्या विकासासाठी सकारात्मक आणि विधायक वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे अभिजीत आपटे यांनी नमूद केले.
रामदास आप्पा काकडे यांच्यासारख्या उद्योजकांकडे केवळ यशस्वी व्यावसायिक म्हणून न पाहता मावळच्या नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक म्हणून पाहिले पाहिजे. त्यांच्या अनुभवातून मावळमध्ये हजारो तरुण उद्योजक घडू शकतात. म्हणूनच रामदास काकडे हे मावळच्या उद्योगशील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहेत, असे अभिजीत आपटे यांनी शेवटी सांगितले.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.