भारताचे पोलिओमुक्त स्थान कायम राखण्यासाठी मुंबईत येत्या २२ नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे दोन डोस देण्यात येणार असून, त्यानंतर २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे..
यापूर्वी पोलिओचे डोस घेतलेल्या बालकांनाही या मोहिमेत पुन्हा दोन डोस देण्याचे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
भारताला २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील देशांमध्ये पोलिओ विषाणूचा प्रसार अद्याप सुरू असल्याने भारतात या विषाणूचा पुन्हा प्रवेश होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे पोलिओमुक्त स्थिती टिकवून ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
कृती दलाची बैठक
या मोहिमेच्या नियोजनासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारी शहरस्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी यांच्यासह जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, वैद्यकीय महाविद्यालये, एकात्मिक बालविकास सेवा योजना, लष्कर, नौदल, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, लसीकरणाचा एकही डोस न घेतलेली बालके तसेच अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांची ओळख पटवण्यावर भर देण्यात आला.
लसीकरणासाठी आवाहन
बालरोगतज्ज्ञ व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी लसीकरणाचे डोस चुकलेल्या बालकांची ओळख पटवून त्यांना लसीकरणासाठी पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे तसेच अंगणवाडी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, मुंबई पोलीस, मोहल्ला समित्या, धार्मिक नेते आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
पालकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा!
२२ नोव्हेंबरला ५ वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचे दोन डोस अवश्य द्यावेत. बालकाचे यापूर्वी नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान पुन्हा दोन डोस देणे आवश्यक आहे. पोलिओपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेने विशेष नियोजन
लसीकरणानंतरचा पाठपुरावा, सामुदायिक बैठका आणि पालकांचे समुपदेशन यावरही भर देण्यात येणार आहे. आरोग्य संस्था, शासकीय विभाग आणि सामुदायिक संघटनांच्या समन्वयातून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.