आपल्या शाळातील पटसंख्या वाढायला हवी म्हणून मुंबई मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवते. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करते. तरीही मराठी व हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत आहे. तर १० वर्षांत इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढला असून १०० पैकी ४८ विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचतात, असा अहवाल प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला..
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत प्रजा फाऊंडेशच्या पदाधिकाऱ्यांसोबतच पालिकेचे माजी आयुक्त सीताराम कुंटे आणि अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे उपस्थित होते.
२०१९-२० या महामारीपूर्व काळात पालिका शाळांमध्ये प्रवेशाचा टक्का ३६ टक्के (२,९८,२१५) होता. तो २०२१-२२ मध्ये वाढून ४२ टक्के (३,१८,००२) झाला, तर २०२४-२५ मध्ये हा आकडा ४४ टक्के (३,१०,०८५) इतका राहिला आहे. प्रवेशात वाढ दिसत असली तरी दहावीपर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. २०२४-२५ पर्यंत १०० विद्यार्थ्यांपैकी केवळ ४८ विद्यार्थीच दहावीपर्यंत पोहोचतात. कोरोनानंतर पालिकेच्या पटसंख्येत वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कोरोनापूर्व काळात पटसंख्या २ लाख ९८ हजार होती. तीच पटसंख्या २०२१-२२ मध्ये ३ लाख १८ हजार झाली होती व आता २०२४ -२५ मध्ये पटसंख्या ३ लाख १० हजार झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र गेल्या दशकभरात महापालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी प्रवेशात अनुक्रमे ३४ टक्के आणि ३९ टक्के घट झाली. मात्र महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशात २०१५-१६ ते २०१४-२५ या काळात ५४ टक्के वाढ झाली आहे.
प्रति विद्यार्थी ११ लाख रुपये खर्च
२०२६-२७ मध्ये मुंबई महानगरपालिका शाळांसाठी ४,१०५ कोटींची तरतूद शिक्षणासाठी करण्यात आली. म्हणजेच प्रति विद्यार्थी अंदाजे ११,३२,३७२ खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला शिक्षण व्यवस्था बळकट करण्याची मोठी संधी आहे, असे मत प्रजा फाऊंडेशनचे आसिफ खान यांनी व्यक्त केले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.