भारताने बीबीसीला कठोर इशारा दिला आहे. बीबीसी इंडियाचे प्रमुख जॅकी मार्टिन यांना अधिकृत पत्र देखील पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार बीबीसीच्या रिपोर्टिंगवर पुढेही बारकाईने लक्ष ठेवणार आहे..
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेत १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. भारत, भारतीय लष्कर व सुरक्षा यंत्रणांविरोधात भडकाऊ, सांप्रदायिक तणाव वाढवणारी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने केलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने या चॅनल्सवर बंदी घातली.
कोणते चॅनल्स बॅन?
बंदी घालण्यात आलेल्या चॅनेल्समध्ये Dawn News, Irshad Bhatti, SAMAA TV, ARY NEWS, BOL NEWS, Raftar, The Pakistan Reference, Geo News, Samaa Sports, GNN, Uzair Cricket, Umar Cheema Exclusive, Asma Shirazi, Muneeb Farooq, SUNO News HD आणि Razi Naama यांचा समावेश आहे.
...म्हणून घातली बंदी
या चॅनेल्सकडून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी, परराष्ट्र संबंधांशी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची व अपप्रचार करणारी माहिती प्रसारित केली जात होती. या चॅनेल्सची एकत्रित प्रेक्षकसंख्या तब्बल ६.३०८० कोटी इतकी होती. सरकारी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे चॅनेल्स खोटी व पडताळणी न केलेली माहिती पसरवून देशात भीतीचे वातावरण निर्माण करणे, धार्मिक तेढ वाढवणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणे यासाठी सक्रिय होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर, तसेच भारताचे परराष्ट्र धोरण यांच्याशी संबंधित बनावट बातम्या हे चॅनेल्स प्रसारित करत होते.
बीबीसीच्या चुकीच्या मथळ्यावर तीव्र नाराजी
"काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीयांसाठी व्हिसा निलंबित केला" या आशयाचा मथळा बीबीसीने दिला होता, ज्यामुळे भारताने बीबीसीला कठोर इशारा दिला आहे. या मथळ्यामुळे जणू काही "भारताने पर्यटकांची हत्या केली" असे भासत असल्याचे म्हणत अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याकडे लक्ष वेधले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या बाह्य प्रचार विभागाने बीबीसीचे भारतातील प्रमुख जॅकी मार्टिन यांच्याकडे देशवासियांच्या "तीव्र भावना" व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, बीबीसीने दहशतवाद्यांना "मिलिटंट्स" (हल्लेखोर) संबोधल्याबाबतही अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकार बीबीसीच्या रिपोर्टिंगवर पुढेही बारकाईने लक्ष ठेवणार आहे. दरम्यान, भारताने यापूर्वीच पाकिस्तान सरकारच्या अधिकृत 'X' (माजी ट्विटर) हँडलवरही निर्बंध घातले आहेत.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.