कैफियत एका रात्र शाळेत प्रामाणिकपणे शिकविणाऱ्या निलेश माळी या हाडाच्या शिक्षकाची..
१ मी रोजी अवघ्या महाराष्ट्रात दिमाखात प्रदर्शित झालेला 'आता थांबायचं नाही.' हा सिनेमा त्याच्या हटके विषयामुळे विजयी घोडदौड करीत आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शक शिवराज वायचळ आहेत. लेखक म्हणून शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांची लेखणी तळपली आहे, तर उमेश कुमार बन्सल, भावेश जाणवलेकर, निधी परमार हिरानंदानी, धर्म वालिया हे या सिनेमाचे प्रोड्युसर आहेत.. भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, प्राजक्ता हनमघर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांनी भूमिका केल्या आहेत.. गुलराज सिंग यांचं संगीत आहे, तर, मनोज यादव यांनी गाणी लिहिली आहेत. अजय गोगावले आणि आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत.
या सिनेमात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांना सुशिक्षित करण्यासाठी त्यावेळच्या असिस्टंट कमिश्नर श्री. उदयकुमार शिरुरकर यांनी सँडहर्स्ट रोड येथील मॉडेल नाईट हायस्कुलच्या मुख्याध्यापिका मनाली पाटणकर मॅडमला सांगितले की तुम्ही साम, दाम, दंड, भेद नीती अवलंब करा पण आमच्या बीएमसी मधील सफाई कर्मचाऱ्यांना तुमच्या रात्रशाळेत शिक्षित करा. मॅडमने ही जबाबदारी स्वीकारली आणि नंतर ती आपसूक निलेश माळी सरांवर आली..
ज्यांच्या शिक्षकी जीवनावर हा सिनेमा आधारित आहे आणि सिनेमात ओम भुतकर यांनी माळी सरांची भूमिका केलेली असली तरी जे मूळ निलेश माळी सर आहेत ते कसे आहेत या विषयी आपण जाणून घेऊया..
निलेश माळी सर मूळचे धुळे जिल्ह्यातील कुसुम्ब गावचे. मात्र, ते अगदी लहानपणापासून डोंबिवली येथे राहतात. रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेत असलेल्या महात्मा गांधी विद्यालयात माळी सरांचे शिक्षण झाले. ते सुरेश बोरसे सर जे सध्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत त्यांचे विद्यार्थी. निलेशच्या आई अशाताई या देखील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. सँडहर्स्ट रोड येथे रात्रशाळेत निलेश २०११ पासून आजतागायत मराठी, इतिहास, भूगोल इत्यादी विषय शिकवीत आहेत. पाटणकर मॅडमने बीएमसी च्या सफाई कर्मचाऱ्यांना शिकविण्याची जबाबदारी निलेश सरांवर टाकली. पाटणकर मॅडम सुद्धा शिकवीत होत्या. मात्र, निलेश सर या विद्यार्थ्यांमध्ये खूप फेमस झाले. निलेश सरांनी मात्र हे आव्हान पेलले त्याच बरोबर या कर्मचाऱ्यांनी सुद्धा दिवसभर काम करून संध्याकाळी न कुरकुरता रात्रशाळेत येणे सुरु केले. काही लोक तर पनवेल वरून येत होते.. सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्रास झाला कारण ते शिक्षणापासून केव्हाच दूर गेले होते. पण, निलेश सरांनी या विद्यार्थ्यांना शिकविलच असा चंग बांधला आणि शिकवायला जोरदार सुरुवात केली. निलेश सर म्हणतात त्यावेळी २३ विद्यार्थी होते आणि ते सर्व विद्यार्थी मेहनत करून पास देखील झाले. नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढून ती ७५ झाली ती आजतागायत वाढतच आहे. एके दिवशी दिग्दर्शक शिवराज वायचळ सर शाळेत आले आणि त्यांनी शिक्षक असलेल्या निलेश माळी यांची मेहनत हेरली. विद्यार्थ्यांनी सुद्धा माळी सरांची वाहवा केली. आणि मग असे करता करता 'आता थांबायचं नाही..' हा चित्रपट प्रत्यक्षात उतरला. निर्माते तुषार हिरानंदानी यांनी सिनेमाच्या स्क्रिनिंगला निलेश माळी सरांचा भव्य सत्कार केला..
निलेश माळी सर शब्द खड्ग सोबत बोलतांना त्यांच्या मनातील खंत बोलून गेले. १७ मे २०१७ रोजी शासनाने एक जीआर नुसार जे सरकारी भत्ते असतात ते कागदावर केव्हाच पास केलेले आहेत. पण मंत्रालयात अनेकदा खेटे घालूनही या कुठल्याच हक्काच्या भत्त्यांचा निलेश माळी सरांना अद्याप पर्यंत फायदा झालेला नाही. हे भत्ते लाल फितीतच अडकून पडलेले आहेत. हे सर्व लाभ निलेश माळी सरांना भेटायला हवेत. ते रात्रशाळेत प्रामाणिकपणे मेहनत करीत आहेत. समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या लोकांना ते मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत. माळी सर अंधारातून विद्यार्थ्यांना प्रकाशात घेऊन जात आहेत मात्र शासकीय लेटलतीफ धोरणांमुळे स्वतः मात्र अजूनही आर्थिक दृष्ट्या अंधारात आहेत. याचा शासनाने आणि संबंधितांनी नक्कीच विचार करायला हवा. माळी सर अत्यंत नम्र आणि प्रसिद्धी पासून दूर राहणारे आहेत. विद्यार्थ्यांनी आणि अगदी सगळ्यांनीच 'आता थांबायचं नाही..' हा चित्रपट पाहण्याचे माळी सर आवाहन करीत आहेत, त्याच बरोबर अगदी काहीही झाले तरी शिक्षण घ्यायलाच हवे असा ते मुलांना आणि मोठ्यांनाही संदेश देत आहेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.