शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रा तर्फे आमच्या सर्व वाचक, जाहिरातदार, पत्रकार, विशेष प्रतिनिधी, व्यवस्थापक मंडळ, कॅमेरामन, वेब डेव्हलपर, हितचिंतक, मार्गदर्शक आणि जनसामान्यांना श्रीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेछया..
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला. यामुळेच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात.
गणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो. पण गणरायाच्या या चौदा विद्या, चौसष्ट कला तुम्हाला माहिती आहे का?
चौदा विद्या
श्रीगणेशविषयक माहिती असलेले प्राचीन ग्रंथ श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे आहेत. आजही हे प्राचीन ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत. श्रीगणेशाला चौदा विद्या अवगत होत्या, श्रीगणेश मोठा ज्ञानी होता. ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसर्याला देऊ शकतो. गणपती हा स्वत: ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असंल्यामुळेच त्याचा आदर्श आपण ठेवला तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो. श्रीगणेशाला बुद्धिदाता म्हणजे बुद्धी देणारा असे म्हटले आहे.
श्रीगणेशाला पुढील चौदा विद्या अवगत होत्या. (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.
काही विद्वानांच्या मते पुढील चौदा विद्या श्रीगणेशाला अवगत होत्या. (१) आत्मज्ञान (२) वेदपठण (३) धनुर्विद्या (४) लिहीणे (५) गणित (६) पोहणे (७) विकणे (८) शस्त्र धरणे (९) वैद्यक (१०) ज्योतिष (११) रमलविद्या (१२) सूपशास्त्र (१३) गायन आणि (१४)गारुड. आणखी इतर ग्रंथांमधून वेगवेगळ्या विद्या सांगितलेल्या आहेत.
आधुनिक काळांत विद्यांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. यावरून एकच म्हणता येईल की गणपती हा सकल विद्यांचा अधिपती होता. सकल ज्ञानी होता., बुद्धिमान होता. म्हणूनच अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशाला ‘ तू ज्ञान आहेस ‘ असे म्हटले आहे.
आधुनिक, वैज्ञानिक काळात तर ज्ञानी माणसाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानी माणसाचे स्थान हे नेहमी उच्च राहिले आहे. या स्पर्धेच्या युगात माणसाने जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घ्यावयास हवे आहे. या पेटंटच्या युगात मूलभूत संशोधन क्षेत्राकडेही तरुणांनी वळले पाहिजे.
चौसष्ट कला
श्रीगणेशाला चौदा विद्यांबरोबरच चौसष्ट कलाही अवगत होत्या. शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथामध्ये पुढील चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत. (१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य. आधुनिक कालात कलांची संख्याही अनेकपटीने वाढली आहे.
या काळात माणसाने एक तरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला आवडीच्या विषयातील नोकरी मिळतेच असे नाही. पण आवडीच्या विषयाची कला मात्र जोपासता येते. दु:खाच्या वेळी अवगत असलेली कला मनाला आधार देते तर सुखाच्यावेळी कला माणसाचे सुख द्विगुणित करीत असते.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.